Spread the love

 खेळता-खेळता पाय घसरल्याने घडली दुर्घटना; इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नशिराबादमध्ये पाण्याच्या हौदात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

नशिराबाद प्रतिनिधी (धीरज सेतवाल)

नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात खेळत असताना पाण्याच्या हौदात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत चिमुकलीचे नाव आकांक्षा प्रवीण इंगळे (वय ३) असे असून, ती भवानीनगर, नशिराबाद येथील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा घराजवळ खेळत असताना तिचा पाय घसरून जवळील पाण्याच्या हौदात पडली. लहान वयामुळे तिला स्वतःचा बचाव करता आला नाही आणि या दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चिमुकलीच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उघडे हौद, विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि जलसाठ्यांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना या घटनेनंतर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version