Spread the love

 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन, संशोधन व केळी विकास उपक्रमांना शासनाच्या सहकार्याची ग्वाही

जळगाव | प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रविवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनातील अत्याधुनिक सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी होते.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवन आणि साहित्य हे संपूर्ण समाजाला दिशा देणारे आहे. विद्यापीठात उभारलेला हा अर्धाकृती पुतळा केवळ स्मारक नसून भावी पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल. बहिणाबाईंचे जीवनतत्त्वज्ञान हेच एक प्रेरणेचे विद्यापीठ आहे.”

यावेळी त्यांनी बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता “माझी माय सरस्वती माले शिकवते बोली” सादर करत मातृभाषा, शिक्षण आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यापीठात ‘बाळासाहेब ठाकरे सेंटर फॉर एक्सलन्स’ उभारण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी वसतिगृहाची इमारत विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती आणि विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बहिणाबाईंचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे सांगत खानदेशातील बोलीभाषांचे संवर्धन व संशोधन होण्याची गरज व्यक्त केली.

विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशनच्या बहिणाबाई ट्रस्ट आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाईंच्या साहित्याचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बहिणाबाईंच्या जीवनातून प्रतिभेला कोणत्याही सामाजिक अथवा शैक्षणिक मर्यादा अडथळा ठरत नाही, हा संदेश मिळतो, असे सांगितले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अहिराणी भाषेच्या भाषांतरासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

यावेळी ‘केळी निर्यात व्यवस्थापन’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘सिलेज निट्रो बॅक’ आणि ‘सिलेज ब्ल्यूटी’ या उत्पादनांच्या माहितीपत्रकांचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यापीठ आणि आयआयटी चेन्नई यांच्यातील कराराअंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. बहिणाबाईंच्या अर्धाकृती पुतळा उभारणीसाठी योगदान देणाऱ्या समिती सदस्यांसह सभागृह उभारणीत योगदान दिलेल्या अभियंते, वास्तुविशारद आणि कंत्राटदारांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन खेमराज पाटील आणि प्रा. वीणा महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version