रस्ते, प्रॉपर्टी चेंबर्ससह विविध विकासकामे प्रगतिपथावर; कामे पूर्ण झाल्यानंतर समस्या कायमस्वरूपी दूर होणार
नशिराबाद | प्रतिनिधी
नशिराबाद शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून विविध विकासकामांना वेग देण्यात आला असून, शहरातील अनेक भागांत रस्ते, प्रॉपर्टी चेंबर्स तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या विकासकामांमुळे भविष्यात शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या सुरू असलेल्या कामांमुळे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी रस्त्यांवर चिखल साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे आणि नागरिकांना तात्पुरता त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. या अडचणींची दखल घेत नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांनी नागरिकांना दिलासा देत या समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी ही कामे अत्यंत आवश्यक आहेत. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्या कायमस्वरूपी दूर होतील.
त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या या विकासकामांना सहकार्य करावे. काही दिवसांचा त्रास सहन केल्यानंतर नशिराबादला अधिक आधुनिक आणि सुविधायुक्त स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरपरिषद प्रशासनानेही विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या असून, नागरिकांचा होणारा त्रास शक्य तितका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
