शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती; १२४ शिक्षकांच्या स्वाक्षरीसह तहसीलदारांना निवेदन
संघरत्न सपकाळे । भुसावळ | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सहाय्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची BLO सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांनी या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात भुसावळ तहसीलदार यांना १२४ शिक्षकांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी BLO अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक कामकाजाबरोबरच अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असून विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनेने BLO सहाय्यक म्हणून शिक्षकांऐवजी ग्रामसेवक, तलाठी, महावितरण कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात धाराशिव जिल्ह्याचा दाखलाही देण्यात आला आहे. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जून २०२६ रोजी आदेश काढून BLO सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या असून त्यांच्या जागी इतर शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
याच धर्तीवर भुसावळ प्रशासनानेही तातडीने निर्णय घेऊन शिक्षकांना BLO सहाय्यक पदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे.
