Spread the love

अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल; डी.बी. पथकाची धडक कारवाई, चोरीतील टीव्ही, एसी आणि दोन लॅपटॉप जप्त

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर शहरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करत शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने एका सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून ७४ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याला चाप बसला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी रात्री १०.४५ ते २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराचा कडी-कोंडा उचकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील १४ हजार रुपयांचा टीव्ही, २० हजार रुपयांचा एसी आणि ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप असा एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ६ जुलै रोजी खर्दे बुद्रुक (ता. शिरपूर) येथील बसस्थानक परिसरातून रविंद्र राजेंद्र पावरा (रा. खर्दे बुद्रुक, ता. शिरपूर, जि. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला टीव्ही, एसी आणि दोन लॅपटॉप असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही पोलीस तपास करत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, विनोद आखडमल, भटू साळुंके, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज महाजन, योगेश दाभाडे, सोमा ठाकरे, आरिफ तडवी तसेच होमगार्ड मिथुन पावरा यांनी संयुक्तपणे पार पाडली. शिरपूर शहर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version