मंजूर बिलाच्या टक्केवारीसाठी मागितली लाच; उपविभागीय अभियंत्यासह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाविरुद्ध गुन्हा
मंजूर बिलासाठी लाचेची मागणी • धुळे एसीबीचा यशस्वी सापळा • दोन अभियंते रंगेहाथ अटकेत • चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धुळे | प्रतिनिधी
कामाचे मंजूर बिल काढून देण्यासाठी टक्केवारीच्या स्वरूपात लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषद चाळीसगाव बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने सापळा रचून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यशार्थ पांडुरंग निनावे (उपविभागीय अभियंता, वर्ग-१) आणि कुलदीप गमे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चाळीसगाव) यांनी मंजूर कामाचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर धुळे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यामध्ये दोन्ही आरोपी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ जाळ्यात अडकले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
