१०६ एलपीजी सिलेंडर, भारत पेट्रोलियमचा टँकर व तीन वाहने जप्त; कारवाईची चाहूल लागताच आरोपी पसार
पिंपळनेर–दहिवेल महामार्गावर संयुक्त कारवाई • १०६ गॅस सिलेंडर जप्त • भारत पेट्रोलियमचा टँकर ताब्यात • महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील अवैध गॅस पुरवठ्याचा संशय
पिंपळनेर | प्रतिनिधी (साकिब सय्यद)
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर–दहिवेल राष्ट्रीय महामार्ग परिसरात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत अवैध एलपीजी गॅस साठा करून व्यावसायिक हॉटेलांना पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कारवाईदरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर, तीन चारचाकी वाहने, १०६ व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने, तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप संसारे यांच्या पथकाने संयुक्त छापा टाकला. पिंपळनेर–दहिवेल महामार्गावरील बालाजी हॉटेलच्या मागील परिसरात हा अवैध गॅस व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती.
प्राथमिक तपासात भारत पेट्रोलियमच्या टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हे सिलेंडर महामार्गालगतच्या हॉटेलांना तसेच महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील काही व्यावसायिक आस्थापनांना अवैधरीत्या विकले जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणामागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
कारवाईदरम्यान भारत पेट्रोलियमचा टँकर (KA-01 AE-6365), महिंद्रा बोलेरो (GJ-19 Y-8316), महिंद्रा बोलेरो (GJ-06 AU-3662) आणि मारुती सुझुकी (MH-18 BG-8667) ही वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय १०६ व्यावसायिक गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटार, पाईप व गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी अन्य उपकरणे पोलिसांनी ताब्यात घेतली.
या कारवाईत महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, जयवंत पाटील, सुभाष गिरी, गणेश माळी, विकास पाटील, मुकेश विसपुते तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप संसारे, पीएसआय राजेंद्र मोरे, एएसआय अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ आणि दावल सैदाणे यांनी सहभाग घेतला.
जप्त केलेले सर्व साहित्य आणि वाहने पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, अवैध गॅस पुरवठा किती दिवसांपासून सुरू होता आणि महाराष्ट्रासह गुजरातमधील कोणकोणत्या हॉटेलांना गॅसचा पुरवठा केला जात होता, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या अवैध गॅस काळाबाजाराला मोठा आळा बसला असून, भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
