शस्त्र, गुटखा, गांजा, दारू व जुगार माफियांवर धडक कारवाया; ८६.२५ टक्के गुन्ह्यांची निर्गती, ‘उत्कृष्ट पोलीस स्टेशन’ पुरस्काराने गौरव
पाचोरा | प्रतिनिधी (भुवनेश दुसाने)
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी ६ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका वर्षात गुन्हेगारीविरोधात आक्रमक आणि परिणामकारक कारवाया करत उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत अवैध शस्त्र, गुटखा, गांजा, दारू आणि जुगार माफियांवर धडक कारवाया केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांमध्ये मोठा वचक निर्माण झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कामगिरीची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनला ‘उत्कृष्ट पोलीस स्टेशन पुरस्कार’ही प्राप्त झाला आहे.
६ जुलै २०२५ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत पोलीस स्टेशनमध्ये एकूण ९१७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ७९१ गुन्ह्यांची मुदतीत निर्गती करण्यात आली असून गुन्हे निर्गतीचे प्रमाण ८६.२५ टक्के इतके आहे. पोलीस स्टेशनचा अभिलेखही सुचीबद्ध व अद्ययावत ठेवण्यात आला आहे.
अवैध शस्त्रविरोधी मोहिमेत २८ तलवारी, १ कोयता, ३ चाकू-सुरे, १ चॉपर, ७ गावठी पिस्टल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच अवैध गुटखा आणि अंमली पदार्थांवर मोठी कारवाई करत ६८ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा आणि ४ लाख २२ हजार ६२० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करून १५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बेपत्ता आणि पळवून नेलेल्या व्यक्तींच्या सुमारे ९० टक्के प्रकरणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत १४ इसमांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यापैकी ८ इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत २०६ गुन्हे दाखल करून १४ लाख ९५ हजार ९५३ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच कलम ९३ अन्वये ५९ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
जुगारविरोधी मोहिमेत ७३ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ४२ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून १ लाख १५ हजार ७४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यानुसार २०२५ पासून आतापर्यंत ३१ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ३० गुन्हे अंमली पदार्थ सेवनाशी संबंधित आहेत. या प्रकरणांपैकी १२ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी, गुन्हेगारीविरोधातील सातत्यपूर्ण मोहिमा आणि कठोर कायदेशीर कारवाईमुळे पाचोरा शहर व परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रभावी वचक निर्माण झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
