नियमानुसार धान्य न मिळाल्याचा दावा; दोन रेशन दुकाने कागदावर, कारभार एकाच ठिकाणावरून सुरू असल्याचा आरोप
मोहिते/संजय । शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बिलाडी (ता. शहादा) आणि बामखेडा (ता. शहादा) येथील रेशन दुकानाच्या कारभाराबाबत नागरिकांनी गंभीर तक्रारी करत धान्य वितरणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित रेशन दुकानाचा परवाना रद्द करून चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या नियमानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कमी प्रमाणात धान्य वितरित केले जात आहे. तसेच बायोमेट्रिक पडताळणी करूनही धान्य वितरणाची छापील किंवा ऑनलाइन पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हक्काचे धान्य मागणाऱ्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचाही दावा नागरिकांनी केला आहे.
याशिवाय, बिलाडी आणि बामखेडा या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र रेशन दुकानांचे परवाने असतानाही प्रत्यक्षात दोन्ही दुकानांचा कारभार बिलाडी येथील एकाच खोलीतून चालवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बामखेडा येथील नागरिक, विशेषतः वृद्ध महिला आणि दिव्यांगांना रेशन घेण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या प्रकरणात पुरवठा विभाग आणि तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
