शेतातून घरी परतताना घडली दुर्घटना; मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील एका ३७ वर्षीय तरुणाचा अंजनी नदीत पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत अंकुश भिल (वय ३७, रा. कल्याणे खुर्द) हे शेतातील काम आटोपून दुपारी सुमारे ३ वाजता घरी परतत होते. यावेळी अंजनी नदीवरील पुलावरून जात असताना त्यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या खोल पाण्यात पडले. खोल पात्रात अडकल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि मित्रमंडळाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. त्यांना नदीतून बाहेर काढून उपचारासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केल्याचे समजते.
रणजीत भिल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. या घटनेमुळे कल्याणे खुर्द गावात शोककळा पसरली आहे.
