डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवर अमळनेर न्यायालयाचा निकाल
चोपडा तालुक्यातील २०२२ मधील घटना • ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बाळाचे प्राण वाचले • डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा • अमळनेर न्यायालयाचा दोषी महिलेला तीन वर्षांच्या शिक्षेचा आदेश
अमळनेर | प्रतिनिधी
चोपडा तालुक्यात प्रसूतीनंतर नवजात बाळाला नाल्यात टाकून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका महिलेला दोषी ठरवत तीन वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
ही घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात घडली होती. गावात उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरू असताना काही ग्रामस्थांना नाल्याकडून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेत नाल्यात पडलेल्या नवजात बाळाला बाहेर काढले. त्यानंतर बाळाला कापडात गुंडाळून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे बाळाचे प्राण वाचले.
या घटनेनंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गावातील नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांची माहिती संकलित केली. आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आलेल्या तपासात एका महिलेची प्रसूती झाल्याची अधिकृत नोंद नसल्याचे समोर आले. त्यानंतर संशयित महिलेची चौकशी करण्यात आली.
पुढील तपासादरम्यान संबंधित महिलेने नवजात बाळाला नाल्यात टाकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले. याशिवाय डीएनए तपासणीद्वारे बाळ आणि संबंधित महिलेतील नातेही सिद्ध झाले. वैद्यकीय अहवाल, डीएनए चाचणी, पोलीस पाटील, आशा सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी यांसह सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमुळे आरोपीविरुद्धचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले.
सर्व पुराव्यांचा सखोल विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी संबंधित महिलेला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
या निकालामुळे नवजात बालकांवरील अत्याचार आणि त्यागाच्या घटनांबाबत न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, अशा गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब किती महत्त्वाचे ठरतात, हेही या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.
