Spread the love

३.१६ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण; यावल, बोदवड आणि रावेर तालुके अद्याप पिछाडीवर

खरीप हंगामाला वेग • जिल्ह्यात ५७.९४% कापूस पेरणी पूर्ण • पारोळा अव्वल, यावल सर्वात मागे • अनुकूल पावसाने उर्वरित पेरणीला गतीची अपेक्षा

जळगाव । संघरत्न सपकाळे | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील कापूस पेरणीला वेग आला असून आतापर्यंत सरासरी ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख १६ हजार ९०७.९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कापूस पेरणी ५७.९४ टक्क्यांवर पोहोचली असून, आगामी काही दिवसांत पावसाची साथ कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरणीही पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

तालुकानिहाय आढावा घेतल्यास पारोळा तालुका ७९.३३ टक्के पेरणीसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर एरंडोल (७६.३७ टक्के)पाचोरा (६९.०५ टक्के)भडगाव (६८.७५ टक्के) आणि अमळनेर (६७.९९ टक्के) या तालुक्यांमध्येही कापूस पेरणीने समाधानकारक प्रगती केली आहे.

दुसरीकडे, यावल (१४.५३ टक्के)बोदवड (२६.९४ टक्के) आणि रावेर (३३.७९ टक्के) या तालुक्यांमध्ये पेरणीचा वेग तुलनेने कमी असल्याने हे तालुके जिल्ह्यात सर्वाधिक मागे असल्याचे चित्र आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि स्थानिक परिस्थितीमुळे काही भागांत पेरणी रखडल्याचे सांगितले जात आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत पावसाची परिस्थिती अनुकूल राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरही पेरणी वेगाने पूर्ण होईल. तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version