निकृष्ट बांधकामाचा आरोप; बी. जी. शिर्के कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलावर मुसळधार पावसानंतर मोठे भगदाड पडल्याने गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक या मार्गावरील उड्डाणपूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१८ ते २०२० या कालावधीत सुमारे १४५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला होता. या कामासाठी कंत्राटदार बी. जी. शिर्के कंपनीला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढही देण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर उड्डाणपुलाच्या गोलाकार भागात मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही याच उड्डाणपुलावर अशाच प्रकारचे भगदाड पडले होते. त्यावेळी संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने उड्डाणपुलाची तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच बांधकामात दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदाराकडून खर्चाची वसुली करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक असल्यास भक्ती-शक्ती उड्डाणपूल धोकादायक घोषित करून वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना न केल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा सचिन काळभोर यांनी दिला आहे.
