Spread the love

दुर्गंधी व भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; १० दिवसांत कारवाई न झाल्यास ‘अर्धनग्न उपोषण’चा इशारा

जळगाव | जगदीश सपकाळे । प्रतिनिधी

जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरालगत असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, हा कचरा डेपो तातडीने अन्यत्र हलवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवा व श्रमिक कामगार संघटनेने केली आहे. यासंदर्भात जळगाव महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून, १० दिवसांत कारवाई न झाल्यास ‘अर्धनग्न उपोषण’ करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, शासकीय आयटीआयच्या मुख्य इमारतीच्या भिंतीलगत कचरा संकलन केंद्र असल्याने पावसाळ्यात परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अस्वच्छता वाढली असून, विद्यार्थ्यांना वर्गात बसणे तसेच जेवण करणेही कठीण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय संस्थेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी यांना सतत त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांवरही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि आरोग्य लक्षात घेता पुढील १० दिवसांच्या आत कचरा संकलन केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा कायदेशीर मार्गाने ‘अर्धनग्न उपोषण’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य रुग्णसेवा व श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान भाऊ पवार, जिल्हा सचिव चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष पवन खंबायत, शहर उपाध्यक्ष कल्पेश व्हिरोडकर, शहर सचिव नंदकिशोर पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन निवेदनाच्या प्रती स्थानिक आमदार राजूमामा भोळे तसेच जळगाव महानगरपालिकेच्या महापौरांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version