पारोळा, जामनेर, यावल व रावेरमध्ये दुचाकी चोरीच्या घटना; चाळीसगावात घरफोडीप्रकरणी संशयित अटकेत
जगदीश सपकाळे । जळगाव । तालुका प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गेल्या काही दिवसांत पारोळा, जामनेर, यावल आणि रावेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. सर्व घटनांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.
पारोळ्यात ५० हजारांची दुचाकी चोरी
पारोळा शहरातील राजीव गांधी नगर परिसरात २ ते ३ जुलैदरम्यान घरासमोर उभी असलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेरमध्ये स्प्लेंडर मोटारसायकल लंपास
जामनेर तालुक्यात सार्वजनिक ठिकाणावरून २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.
यावलमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी
यावल तालुक्यातील किनगाव येथे घरासमोर उभी असलेली ५० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
रावेरमध्ये शेतातून प्लॅटिना मोटारसायकल गायब
रावेर तालुक्यातील शेत परिसरातून ५० हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.
चाळीसगावात घरफोडी; संशयित अटकेत
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव येथे घरफोडी करून ६ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, वाहनधारकांनी दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी करणे, लॉकिंग सिस्टीमचा वापर करणे आणि सीसीटीव्ही असलेल्या परिसरात वाहने पार्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
