स्वतःच्या मालकीचा प्लॉट असल्याचे भासवून रक्कम उकळल्याचा आरोप; ताबा व कागदपत्रे न दिल्याने पोलीस ठाण्यात धाव
भुवनेश्वर दुसाने । पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहरात प्लॉट विक्रीच्या व्यवहारातून एका महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या मालकीचा प्लॉट असल्याचे सांगून मोठी रक्कम स्वीकारल्यानंतरही प्लॉटचा ताबा व आवश्यक कागदपत्रे न दिल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली संदीप शेवरे (वय ४४, रा. गणेश कॉलनी, पाचोरा) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. घर बांधण्यासाठी त्यांनी पाचोरा शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक ३०३५, गट क्रमांक ३५, प्लॉट क्रमांक २२ येथील जागेचा व्यवहार केला होता.
फिर्यादीनुसार, रविंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत (रा. पाचोरा) याने संबंधित प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे सांगून ५ ऑगस्ट २०२४ ते १ जून २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये फिर्यादीकडून १३ लाख ५१ हजार रुपये स्वीकारले. मात्र, संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही प्लॉटचा ताबा दिला नाही किंवा व्यवहाराशी संबंधित आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.
