Spread the love

१० दिवसांत ५२ वाहनांवर कारवाई; ₹२७,५०० दंड वसूल, एसटी व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम

संघरत्न सपकाळे । भुसावळ तालुका। प्रतिनिधी

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार भुसावळ बस स्थानक व परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १० जुलै २०२६ या कालावधीत ५२ अवैध वाहनांवर कारवाई करून २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी बस स्थानक परिसरात महामंडळाच्या अधिकृत वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही खासगी वाहनांना प्रवासी भरणे, उतरविणे किंवा वाहन उभे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव विभागात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. ७ जुलै) जळगाव विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव यांनी भुसावळ बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी भुसावळ वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संयुक्त कारवाईदरम्यान बस स्थानक परिसरात विनापरवाना व अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना समज देण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी जळगाव विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, भुसावळ आगार व्यवस्थापक राकेश शिवंदे, बस स्थानकाचे स्टँड इन्चार्ज जयेश लोहार तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेच्या सातव्या दिवसापर्यंत ५२ अवैध वाहनांवर कारवाई करून ₹२७,५०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम १० जुलैपर्यंत सुरू राहणार असून, अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील कारवाई भविष्यात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version