आव्हाणी फाटा येथे ‘वीरा पेट्रोलियम’चे उद्घाटन; प्रामाणिक सेवा, दर्जेदार इंधन व ग्राहकाभिमुखतेची ग्वाही
जळगाव | प्रतिनिधी
आव्हाणी फाटा येथे भारत पेट्रोलियमच्या नव्या ‘वीरा पेट्रोलियम’ इंधन सेवा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रामाणिक सेवा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास हेच कोणत्याही उद्योगाचे खरे भांडवल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “उद्योग क्षेत्रातील यशामागे कुटुंबाची साथ, संघर्षाची जिद्द आणि जनतेचा विश्वास हेच खरे भांडवल असते. पेट्रोल पंपातून केवळ आर्थिक नफा मिळवणे महत्त्वाचे नाही, तर ग्राहकांचा विश्वास कमावणे अधिक महत्त्वाचे आहे. अचूक मोजमाप, दर्जेदार इंधन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचे समाधान या चार आधारस्तंभांवर ‘वीरा पेट्रोलियम’ची वाटचाल उभी राहील.”
ते पुढे म्हणाले की, जनतेचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी संपत्ती असून, जनसेवेची भावना कायम ठेवत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी भारत पेट्रोलियमचे टेरिटरी मॅनेजर राहुल कचरे यांनी ‘वीरा पेट्रोलियम’ हा सुरत–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील बीपीसीएलच्या सेवाविस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगितले. उत्कृष्ट सुविधा, दर्जेदार इंधन आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे हा पेट्रोल पंप अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीपीएस संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. त्यांनी ‘वीरा पेट्रोलियम’च्या स्थापनेमागील उद्देश, ग्राहकाभिमुख सेवा आणि भविष्यातील नियोजन याविषयी माहिती देत, येथे ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारत पेट्रोलियमकडे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूषण पाटील यांनी केले, तर आभार जीपीएस कॉलेजचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.
यावेळी भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर आदित्य कुमार, इंजिनिअरिंग ऑफिसर धनंजय कुमार, संभाजीनगर विभागाचे सेल्स मॅनेजर हरीशजी, उपमहापौर मनोज चौधरी, मोहम्मदभाई मूर्तिजा शेख, अभय जैन, सुनील पाटील, अमोल पाटील, सुभाष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
