Spread the love

विद्यार्थ्यांना डेंग्यू प्रतिबंध, एचपीव्ही लसीकरण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले

धरणगाव | प्रतिनिधी – प्रशांत शिंदे

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि ‘आपला दवाखाना’, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डेंग्यू जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधव आणि तालुका आरोग्य सहाय्यक संजय ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना डेंग्यूची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसरात साचलेले पाणी नष्ट करणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे आणि डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी व उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. पात्र मुलींनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचपीव्ही लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी योग्य पद्धतीने हात धुण्याचे (Hand Wash Technique) प्रात्यक्षिक सादर करून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

यावेळी आरोग्य पर्यवेक्षक भंगाळे सर, आरोग्य सहाय्यक आधार भोई, स्टाफ नर्स सुरेखा वसावे, स्टाफ नर्स पायल वाघ, एमपीडब्ल्यू मयूर पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनावणे, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डेंग्यू प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारून आपल्या कुटुंबात व परिसरात जनजागृती करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version