‘देशाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे; जिवंत राहून लढा अधिक प्रभावीपणे पुढे न्या’, अशी केली विनंती
सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची चिंता • राजाराम खरात यांचे खुले पत्र • देशहितासाठी उपोषण मागे घेण्याचे आवाहन • आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्ला
पुणे | प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राजाराम खरात यांनी त्यांना भावनिक आवाहन करत देशहितासाठी उपोषण थांबविण्याची विनंती केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देशाला व समाजाला सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची भविष्यातही आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.
राजाराम खरात यांनी म्हटले आहे की, “देशाच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपण उभारलेला लढा प्रेरणादायी आहे. मात्र, आपल्या आरोग्याची आम्हाला अधिक चिंता आहे. आपण जिवंत राहून हा संघर्ष अधिक प्रभावीपणे पुढे नेऊ शकता.”
त्यांनी पुढे म्हटले की, “सध्याच्या परिस्थितीत जनहिताचे निर्णय तातडीने होतील, अशी अपेक्षा कमी असली तरी संघर्ष थांबविण्याची गरज नाही. मात्र, उपोषणामुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर ठरू शकतो. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे.”
खरात यांनी अशीही इच्छा व्यक्त केली की, सोनम वांगचूक यांच्या समर्थकांमधील पाच कार्यकर्त्यांनी मोसंबीचा ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडवावे. “देशासाठी आपले आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले.
या निवेदनामुळे सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, विविध स्तरातून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
