आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन; वारकऱ्यांशी साधला संवाद, मंदिर ट्रस्टकडून सत्कार
पंढरपूर / जळगाव | प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठू माऊलीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. दरवर्षीच्या परंपरेनुसार यंदाही त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर विठ्ठलाच्या चरणी साकडे घालताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात वेळेवर आणि भरघोस पाऊस पडू दे. बळीराजाच्या कष्टाला यश लाभू दे. प्रत्येक कुटुंब सुखी आणि समृद्ध राहो. वारकरी संप्रदायाची अखंड सेवा सुरू राहो आणि संपूर्ण महाराष्ट्रावर विठू माऊलीची कृपादृष्टी कायम राहो,” अशी भावपूर्ण प्रार्थना त्यांनी केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची, भक्तीची आणि समतेची ओळख आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने समाजसेवेची नवी ऊर्जा मिळते आणि जनतेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
मंदिर परिसरात त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील सर्व नागरिकांना आषाढी वारीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे ट्रस्टी संभाजी शिंदे यांच्या हस्ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंदिर समितीचे संचालक संभाजीराजे शिंदे, पंढरपूर नगराध्यक्षा प्रणिती भालके, कैलास पाटील, मोतीआप्पा पाटील यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
