महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि सुविधांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
पाचोरा | प्रतिनिधी भुवनेश दुसाने
महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि सोयीसुविधांना प्राधान्य देत पाचोरा तहसील कार्यालयात अत्याधुनिक ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनीता किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांना शासकीय कार्यालयात आवश्यक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि सन्मानपूर्वक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
उद्घाटन समारंभास जिल्हाप्रमुख रावसाहेब जीभाऊ पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, नायब तहसीलदार प्रतिभा मॅडम, सुषमा मॅडम, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सुविधांसाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांची गरज अधोरेखित केली. भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
