तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल विभागाची धडक कारवाई; वैध कागदपत्रे नसल्याने वाहनावर कारवाई
भुवनेश्वर दुसाने पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील मौजे लोहटार येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे एक एलपी वाहन महसूल विभागाच्या पथकाने जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय, पाचोरा येथे जमा केले आहे.
तहसीलदार विजय बनसोडे यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात ग्राम महसूल अधिकारी अतुल पाटील, अमोल शिंदे, गंगाधर सुरनर, अजमल शहा मकानदार, महसूल सेवक राहुल पाटील, तसेच वाहनचालक सुनील पाटील यांनी सहभाग घेतला.
महसूल विभागाच्या पथकाने लोहटार परिसरात संशयास्पदरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एलपी वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे आढळून न आल्याने वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून, अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
