Spread the love

मालेगावच्या व्यक्तीकडून १४२ कफ सिरपच्या बाटल्या जप्त • ₹२४,७३० चा मुद्देमाल हस्तगत • एनडीपीएस व औषध कायद्यान्वये गुन्हा दाखल

धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक कफ सिरपची विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगणाऱ्या एका संशयितास अटक करत १४२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ₹२४ हजार ७३० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांनी विशेष मोहीम राबविली.

दरम्यान, दि. १५ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मालेगाव येथील एक व्यक्ती गुंगीकारक कफ सिरपच्या बाटल्या विक्रीसाठी मोराणे (ता. जि. धुळे) येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने दोन शासकीय पंच व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोराणे परिसरातील महामार्गावर सापळा रचला.

यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या शकील सैय्यद दाऊद (वय ३६, रा. नोमाणी नगर, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील बॅगेची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून गुंगीकारक कफ सिरपच्या १४२ बाटल्या आढळून आल्या. या बाटल्या कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमे तसेच गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच पोलीस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे आणि विवेक वाघमोडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version