घोषणाबाजीप्रकरणी शहर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोशी कचरा डेपो येथील कर्मचारी मृत्यू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात झालेल्या घोषणाबाजीवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले आहे. भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रकरणी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करत शहर नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तक्रारीत आंदोलनादरम्यान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात घोषणाबाजी होत असताना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यावेळी मौन का बाळगून होते, असा सवालही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
सचिन काळभोर यांनी ही तक्रार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे पाठवली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
मोशी कचरा डेपो प्रकरणी झालेल्या आंदोलनामुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना आता भाजपच्या अंतर्गत नाराजीचीही चर्चा सुरू झाली आहे. या तक्रारीवर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
