जिल्हाधिकारींकडून प्रशासकीय मंजुरी; अजिंठा चौफुली ते चिंचोली विमानतळ मार्ग होणार सुरक्षित, प्रकाशमय आणि आकर्षक
जिल्हा नियोजन समितीची मंजुरी • ५.०५ कोटींची एलईडी प्रकाशयोजना • विमानतळ मार्गाचा कायापालट • पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडणार असून, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून अजिंठा चौफुली ते चिंचोली विमानतळ परिसरापर्यंतच्या प्रमुख मार्गावर अत्याधुनिक एलईडी विद्युत प्रकाशयोजना उभारण्यासाठी ५ कोटी ५ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या कामास मान्यता दिल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या मार्गावर कायमस्वरूपी आधुनिक प्रकाशयोजना उभारण्याची मागणी सातत्याने होत होती.
दि. ७ जुलै २०२६ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी संबंधित विभाग, महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.
या प्रकल्पासाठी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला बैठकीत उपस्थित सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनीही प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली.
समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून १५ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ५.०५ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली. या निधीतून अजिंठा चौफुली ते चिंचोली विमानतळ मार्गावर अत्याधुनिक एलईडी पथदिवे उभारले जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे विमानतळाकडे जाणारा प्रमुख मार्ग अधिक सुरक्षित, आधुनिक आणि आकर्षक होणार असून, जळगाव शहराच्या प्रवेशद्वाराचे सौंदर्यही खुलणार आहे. वाढत्या हवाई संपर्काला पूरक अशा पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
