Spread the love

बीएलओंची माहिती सार्वजनिक करण्यासह सहा प्रमुख मागण्या; पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडे साकडे

SIR मोहिमेबाबत जनजागृतीची मागणी • बीएलओंची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी • सहाय्यता केंद्र सुरू करण्याचा आग्रह • रिपब्लिकन सेनेचे तहसीलदारांना निवेदन

सुरेश जगताप उल्हासनगर | विशेष प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावरील बीएलओ (Booth Level Officer) यांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने उल्हासनगर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान अनेक नागरिकांना आवश्यक माहिती मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेत मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह मतदार नोंद अद्ययावत करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक नागरिकांना संबंधित बीएलओचे नाव, संपर्क क्रमांक, आवश्यक अर्ज आणि कागदपत्रांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक पात्र मतदारांच्या घटनात्मक मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख मागण्या :

  • तालुकास्तरावर SIR संदर्भात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी.

  • प्रत्येक मतदान केंद्रावरील बीएलओचे नाव, मोबाईल क्रमांक व कार्यक्षेत्र सार्वजनिक करण्यात यावे.

  • ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत.

  • वृत्तपत्रे, सोशल मीडिया, केबल टीव्ही आणि ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना आवश्यक माहिती देण्यात यावी.

  • अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी आणि मार्गदर्शनासाठी विशेष सहाय्यता केंद्र सुरू करण्यात यावीत.

  • बीएलओंनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत, या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती रिपब्लिकन सेनेने प्रशासनाकडे केली आहे.

या निवेदनावर ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा अलकाताई जगताप, जिल्हा उपाध्यक्ष प्राचीताई पवार, विधानसभा अध्यक्ष संजय यादव, सरचिटणीस बाळकृष्ण शिंदे, उल्हासनगर शहराध्यक्ष अॅड. महेंद्र निकम, उपाध्यक्ष किशोर निकम, सचिव सुनील भालेराव, संघटक सुनील सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version