Spread the love

तालुका आरोग्य विभागाचा प्रभावी उपक्रम; डेंग्यू प्रतिबंध, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि योग्य हात धुण्याचे प्रात्यक्षिक

धरणगाव | प्रतिनिधी

डेंग्यूमुक्त धरणगाव घडविण्याच्या उद्देशाने तालुका आरोग्य विभागाच्या वतीने धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी डेंग्यू तसेच विविध संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उत्साहात पार पडला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डेंग्यूची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधवआरोग्य पर्यवेक्षक भंगाळेआरोग्य सहाय्यक भोई आणि एमपीडब्ल्यू पी. एस. गायकवाड यांनी साचलेले पाणी त्वरित नष्ट करण्याचे महत्त्व, परिसर स्वच्छ ठेवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे तसेच ताप आल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. यासोबतच विविध संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने हात धुण्याचे (Hand Wash Technique) प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

या प्रसंगी स्टाफ नर्स सुरेखा वसावे, स्टाफ नर्स पायल वाघ, एमपीडब्ल्यू मयूर पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेवटी विद्यार्थ्यांनी “डेंग्यूमुक्त परिसर, स्वच्छ परिसर” हा संकल्प करून आपल्या कुटुंबात आणि समाजात स्वच्छता व आरोग्यदायी सवयी रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version