Congenital Afibrinogenemia या दुर्मिळ विकारावर वेळेत उपचार; मुंबईत शस्त्रक्रियेनंतर मुलगा सुखरूप, डॉक्टर राजेश मानवतकर यांनी व्यक्त केल्या भावना
दुर्मिळ रक्तविकारावर यशस्वी उपचार • पोटातून ३ लिटर रक्त काढले • वेळेवर उपचारांनी वाचला जीव • रुग्णाच्या पुनर्भेटीने डॉक्टर भावूक
भुसावळ | संघरत्न सपकाळे
१५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलेल्या दुर्मिळ रक्तविकारावर वेळेत उपचार करून त्याला नवजीवन मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. भुसावळ येथील डॉ. राजेश मानवतकर (एम.डी., मेडिसिन व हृदयरोग तज्ज्ञ) यांनी या अनुभवाबद्दल भावना व्यक्त करत, “आजचा दिवस माझ्यासाठी डॉक्टर म्हणून नव्हे, तर माणूस म्हणूनही अत्यंत समाधानाचा आणि भावनिक ठरला,” असे सांगितले.
काही दिवसांपूर्वी हा १५ वर्षीय मुलगा अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांच्या रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. पोटात तब्बल ३ लिटर रक्त साचले होते, रक्तदाब अत्यंत कमी झाला होता आणि जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.
तपासणीत त्याला Congenital Afibrinogenemia हा रक्त गोठण्याचा अत्यंत दुर्मिळ आणि जन्मजात विकार असल्याचे निदान झाले. या विकारामुळे अगदी किरकोळ कारणानेही जीवघेणा रक्तस्राव होऊ शकतो.
डॉ. मानवतकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपचार सुरू केले, रक्त चढवले आणि पुढील उपचारासाठी रुग्णाला मुंबईतील तज्ज्ञांकडे हलविण्याचा निर्णय घेतला. मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातील साचलेले रक्त काढण्यात आले आणि मुलाचा जीव वाचविण्यात यश आले.
उपचारानंतर पूर्णपणे बरा झालेला तोच मुलगा नुकताच आपल्या आई-वडिलांसह हसतमुखाने डॉ. मानवतकर यांची भेट घेण्यासाठी आला. केवळ “धन्यवाद” म्हणण्यासाठी आलेल्या या भेटीने डॉक्टर भावूक झाले.
याबाबत भावना व्यक्त करताना डॉ. मानवतकर म्हणाले, “रुग्णाचे हसू, त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि ‘आमचा मुलगा वाचला’ हे शब्दच डॉक्टर म्हणून आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस असते.”
या उपचार प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर, शल्यचिकित्सक, रक्तपेढी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सौ. अर्चना चौधरी तसेच मुंबईतील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाचे त्यांनी आभार मानले. तसेच “उपचार करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असले तरी जीवनदान देणारा खरा वैद्य परमेश्वरच असतो,” अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.
