Spread the love

स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने वृक्षारोपण मोहीम; धरणगावसह विविध गावांमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवड

‘वृक्ष ही जीवन, वृक्ष हाच धर्म’चा संदेश • हरित यज्ञ अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद • २०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट • पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभाग

धरणगाव | वाल्मिक पाटील, प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धन, वाढते तापमान, घटते प्राणवायूचे प्रमाण आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या प्रेरणेने देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित यज्ञ’ वृक्षारोपण अभियानाला धरणगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “वृक्ष ही जीवन, वृक्ष हाच धर्म” हा संदेश देत धरणगाव, पाळधी, धानोरे, बांभोरी आणि गंगापुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

या अभियानांतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते गुलाबराव वाघ, नगरसेवक परमेश्वर महाजन, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाजन, तालुकाप्रमुख प्रमोद बयस तसेच गुरुबंधू यांच्या हस्ते शहरातील बालाजी नगर आणि विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत नागरिकांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.

यावेळी तालुकाप्रमुख प्रमोद बयस यांनी सांगितले की, वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणे, पर्यावरणीय समतोल राखणे आणि भावी पिढ्यांना हिरवागार वारसा देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आवाहनानुसार देशभरातील लाखो भक्त आणि स्वयंसेवक दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करतात. केवळ वृक्ष लावणे नव्हे, तर प्रत्येक वृक्षाचे स्वतःच्या मुलाप्रमाणे संगोपन करणे, हीच हरित यज्ञ अभियानाची खरी संकल्पना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर्षी धरणगाव शहर आणि तालुक्यात आतापर्यंत १०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, पुढील पाच दिवसांत आणखी १०० वृक्षांची लागवड करून २०० वृक्षांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ, नगरसेवक परमेश्वर महाजनज्ञानेश्वर महाजन, तालुकाप्रमुख प्रमोद बयस, शहरप्रमुख अरुण पाटील, सचिव रामकृष्ण माळीमुन्ना मराठे, कॅम्प प्रमुख खुशाल भावसारअमोल चौधरी, संजीवनी प्रमुख राजेंद्र अवसरमोलवीरसिंह बयस यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुबंधू उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, हा संदेश देणारे हे अभियान धरणगाव तालुक्यात हरित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version