मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम; पशुपालनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर
जळगाव | प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरावा, यासाठी पात्र पशुपालक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या जनजागृतीसाठी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन (CCIF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, जळगाव येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी करिश्मा नायर यांनी पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शासकीय योजनांचा प्रभावी लाभ आणि ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या संधी यावर भर देत अधिकाधिक पशुपालकांनी शासनाच्या योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढविणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच उपलब्ध अनुदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पशुपालकांनीही विविध शंकांचे निरसन करून योजनेबाबत माहिती जाणून घेतली.
