अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध; संविधान संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा निर्धार
बापुसाहेब घोडेस्वार अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ बुद्ध विहार, सिद्धी बाग येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या अनुयायांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. तसेच संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीतील चर्चेनंतर ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात विराट संविधान बचाव मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील आंबेडकरी समाज, विविध सामाजिक संघटना, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी तसेच संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवाडा, पांचवीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, टेली खुंट, नेताजी सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मार्गे नीलक्रांती चौक येथे समारोप होणार आहे.
बैठकीत वक्त्यांनी अनुसूचित जातींच्या यादीतील उपवर्गीकरणाच्या विषयावर आपली भूमिका मांडताना, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या अनुसूचित जातींमध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला असल्याचे मत व्यक्त केले. तसेच उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द होईपर्यंत संविधान, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
९ ऑगस्ट रोजी आयोजित संविधान बचाव मोर्चात जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बैठकीस समस्त आंबेडकरी समाजाचे अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
