Spread the love

तापी नदीकाठावर गावठी दारूच्या भट्ट्या पुन्हा सक्रिय; कारवाईची ग्रामस्थांची मागणी

जळगाव | सोमेश मुळे

जळगाव तालुक्यातील देऊळवाडा परिसरात तापी नदीच्या किनारी भरदिवसा अवैध गावठी दारूची निर्मिती व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था, सामाजिक स्वास्थ्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तापी नदीकाठावरील झाडीझुडपांचा आडोसा घेऊन अस्वच्छ वातावरणात गावठी दारू तयार केली जात आहे. यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने या भागात छापेमारी करून मोठ्या प्रमाणावर रसायन व साहित्य नष्ट केले होते. मात्र, कारवाईनंतर काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा अवैध भट्ट्या सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अवैध दारूची दुचाकी व इतर वाहनांद्वारे परिसरातील गावांमध्ये तसेच जळगाव शहरात वाहतूक केली जात असल्याचाही दावा नागरिकांनी केला आहे. भरदिवसा सुरू असलेल्या या प्रकारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. विरोध करणाऱ्यांना धमकावले जात असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे.

स्थानिकांच्या आरोपानुसार, संबंधित ठिकाणांची माहिती पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला असूनही सातत्यपूर्ण व कठोर कारवाई होत नाही. केवळ किरकोळ गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधारांवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

देऊळवाडा येथील ग्रामस्थ, विशेषतः महिला, यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाकडे या अवैध दारू भट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाई करून परिसर अवैध व्यवसायमुक्त करण्याची मागणी केली आहे. वेळीच प्रभावी उपाययोजना न झाल्यास तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका वाढेल, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version