द्वारकामाई लॉजमधील चोरीचा जलद छडा; मुद्देमालासह आरोपी ताब्यात
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील व्यापाऱ्यांना सोने दाखविण्यासाठी गुजरातमधील जुनागड येथून आलेल्या सराफ व्यापाऱ्याचे सुमारे दीड कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लॉजमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा आझाद नगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले, त्यामुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनभाई दुर्लभभाई काचलिया (वय ६५, रा. जुनागड, गुजरात) हे धुळेतील सराफ व्यापाऱ्यांना सोने दाखविण्यासाठी आले होते. त्यांनी धुळेतील द्वारकामाई लॉज येथील रूम क्रमांक २१९ मध्ये मुक्काम केला होता. याच ठिकाणाहून त्यांच्याकडील सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने चोरीला गेले.
घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हितेश सुरेश सोनी (वय ४२, रा. प्लॉट क्र. २७, मालेगाव रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांच्यासह गौतम सपकाळे, योगेश शिरसाट, रफिक पठाण, शांतीलाल सोनवणे, संदीप कडरे, मनोज बागुल, विजय शिरसाठ, योगेश शिंदे, पंकज जोंधळे, अनिल शिंपी आणि मकसूद खान पठाण यांचा सहभाग होता.
