Spread the love

जिल्हाभरातील ३५ वार्ताहरांचा उत्स्फूर्त सहभाग; मुख्य संपादक मुकुंदराव नन्नवरे यांचे मार्गदर्शन, दैनिकाच्या विस्तारासाठी प्रतिनिधींच्या सूचना

जळगाव | प्रतिनिधी

दैनिक जन सम्राट टाइम्सच्या जिल्हाभरातील वार्ताहरांचा स्नेहमेळावा, ओळखपत्र वितरण समारंभ आणि पत्रकारितेतील विविध विषयांवरील मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. १९ जुलै) दुपारी १२ ते ३ या वेळेत आयोजित कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील तब्बल ३५ वार्ताहरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिकाचे मुख्य संपादक तथा संस्थापक अध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे होते. यावेळी त्यांनी पत्रकारितेतील बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व, वृत्तांकनातील अचूकता, निष्पक्षता आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. पत्रकारांनी सत्य, विश्वासार्हता आणि समाजहिताला प्राधान्य देत काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दैनिक जन सम्राट टाइम्सच्या यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी जिल्ह्यातील वार्ताहरांनी स्थानिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून समाजाप्रती आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला राष्ट्रपती पदक विजेते दिनकर अडकमोल यांनीही विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली. त्यांनी पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत प्रामाणिक आणि धाडसी पत्रकारितेची गरज असल्याचे सांगितले.

ओळखपत्र वितरण समारंभात जिल्ह्यातील सर्व वार्ताहरांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यामुळे वार्ताहरांना त्यांच्या कामकाजात अधिकृत ओळख मिळण्याबरोबरच जबाबदारीची जाणीव अधिक बळकट होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित वार्ताहरांनीही आपली मते मांडत वृत्तांकन करताना येणाऱ्या विविध अडचणी, ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, माहिती संकलनातील अडथळे तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दे उपस्थित केले. या सर्व बाबींवर मुख्य संपादक मुकुंदराव नन्नवरे यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेतली.

यावेळी अनेक वार्ताहरांनी दैनिकाचा अधिक विस्तार व्हावा, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बातम्यांना अधिक स्थान मिळावे तसेच दैनिकाची पाने वाढवून वाचकांना अधिक दर्जेदार आणि व्यापक आशय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही संस्थापक अध्यक्षांकडे केली. यावर सकारात्मक विचार करून दैनिकाच्या भविष्यातील विस्तारासाठी नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही नन्नवरे यांनी दिली.

स्नेहमेळाव्यामुळे जिल्हाभरातील वार्ताहरांना एकमेकांशी संवाद साधण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि संस्थेच्या भावी वाटचालीबाबत विचारमंथन करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहांशी सुसंगत राहून जन सम्राट टाइम्स अधिक सक्षम आणि व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. आपुलकी, स्नेह आणि पत्रकारितेच्या बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version