धम्म प्रचार, संघटनात्मक कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
भुसावळ | प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या भुसावळ तालुका व भुसावळ शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९ जुलै) गांधीनगर येथील धम्मशील बुद्ध विहार येथे एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या शिबिराला परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
शिबिराची सुरुवात तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ तालुका अध्यक्ष राजेश आव्हाड होते. त्यांच्या अध्यक्षपदाला प्रवीण डांगे यांनी अनुमोदन दिले. सूत्रसंचालन आनंदमित्र सपकाळे यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुमंगल (रवींद्र) अहिरे यांनी केले.
विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शिबिरात राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे, जिल्हाध्यक्ष सुमंगल (रवींद्र) अहिरे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. संजीवकुमार साळवे आणि संघरत्न दामोदरे यांनी कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यामध्ये संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे, शाखांचे कामकाज, हिशोब लेखन, कार्यकर्त्यांची आचारसंहिता, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि धम्म प्रचारातील शिस्त यांसारख्या विषयांचा समावेश होता.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र वानखेडे, प्रकाश सरदार, बी. एस. पवार, समता सैनिक दलाचे मेजर रमेश साळवे, शहराध्यक्ष प्रवीण डांगे, शहर सचिव युवराज इंगळे, संभाजी सोनवणे, सुरेंद्र हिवाळे, उत्तम सुरवाडे, जयराज धुरंदर, प्रवीण बोदडे, प्रवीण तायडे आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका सरचिटणीस आनंदमित्र सपकाळे, तालुका कोषाध्यक्ष संभाजी सोनवणे, शहराध्यक्ष प्रवीण डांगे, शहर सरचिटणीस युवराज इंगळे आणि शहर कोषाध्यक्ष नितीन सुरवाडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
