आर्टिस्ट व्हिजन व रीडर्स क्लबतर्फे चित्रकलेच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती
संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी
बालपणापासूनच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जाणीव मुलांच्या मनात रुजविणे ही काळाची गरज असून, पर्यावरण संवर्धनासाठी धडपडणाऱ्या हातांना समाजाने साथ द्यावी, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले.
भुसावळ शहरातील आर्टिस्ट व्हिजन आणि रीडर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात आयोजित पर्यावरण जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. मेढे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगाचा संदर्भ देत वृक्षांशी नातं जोडण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आजपासूनच वृक्ष लागवड व संवर्धनाची संस्कृती रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांनी केले होते. चित्रकलेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश बालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
प्रा. डॉ. मेढे यांनी राजेंद्र जावळे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत साहित्य, संगीत, चित्रकला, नृत्य, नाट्य आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचा गौरव केला. समाजहितासाठी उपक्रमशील राहणारे शिक्षक म्हणून त्यांनी त्यांचा उल्लेख केला.
चित्रकलेसारख्या सर्जनशील माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम बालकांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
