Spread the love

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना; बुद्धिबळातून एकाग्रता, तर्कशक्ती व निर्णयक्षमतेचा संदेश

पारोळा | प्रतिनिधी (संदीप पाटील)

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पारोळा येथे विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणे, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पंकज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष संकेत पाटील आणि उपमुख्याध्यापिका सौ. पूजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या माध्यमातून जीवनातील नियोजन, संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष संकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून तो बौद्धिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तर्कशक्ती, निर्णयक्षमता, संयम, नियोजन कौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबरच अशा बौद्धिक खेळांमध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात मनोज पाटील सर यांनी जागतिक बुद्धिबळ संघटना (FIDE) तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचा इतिहास आणि महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भारताने जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी, भारतीय ग्रँडमास्टर्सचे योगदान आणि देशाची वाढती आंतरराष्ट्रीय ओळख याबाबतही त्यांनी माहिती दिली.

तसेच नेहा जावरे मॅडम यांनी भारतातील बुद्धिबळ क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंची माहिती देत विद्यार्थ्यांना या खेळातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि शिस्त यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेश दिला.

स्पर्धेत विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत आपली बुद्धिमत्ता आणि रणनीतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रत्येक डावात विद्यार्थ्यांनी संयम, नियोजन आणि कौशल्याचा उत्कृष्ट संगम घडवून आणला. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धात्मक भावना निर्माण झाली असून त्यांना आपल्या बौद्धिक क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version