सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पाचोऱ्यात समता सैनिक दलाचे आंदोलन; राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयाला निवेदन
भुवनेश्वर दुसाने पाचोरा | वार्ताहर
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ समता सैनिक दलाच्या वतीने सोमवारी (दि. २०) पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष मार्शल किशोर डोंगरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जाचा निषेध व्यक्त केला.
लोकशाहीत शांततामय मार्गाने आपले मत मांडण्याचा अधिकार हा नागरिकांचा घटनात्मक हक्क असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत व्यक्त केले.
शासनाने शांततापूर्ण आंदोलनांकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता जनतेचा आवाज म्हणून स्वीकारावे आणि आंदोलनकर्त्यांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या वेळी अरुण खरे, अभिमान बाविस्कर, सुकलाल पवार, अलकाताई मोरे, शशीकांत मोरे, पाचोरा तालुका अध्यक्ष पिटू सावळे, अजय संसारे, दशरथ तांबे, शहराध्यक्ष प्रवीण वाघ तसेच जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
