Spread the love

स्थानिक उद्योजक व महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ; ‘अमृत’च्या उपक्रमातून थेट ग्राहकांशी जोडण्याची संधी

नंदुरबार | प्रतिनिधी

स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत – AMRUT) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या **‘अमृतपेठ थेट बाजारपेठे’**चा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. २० जुलै) नंदुरबार येथे उत्साहात पार पडला.

या बाजारपेठेचे उद्घाटन धर्म जागरण जिल्हा प्रचारक प्रमुख संजयजी वालतुरेनागनाथ जोशीअमृत सखी दीपाली राजपूत आणि ब्राह्मण पंच अध्यक्ष पंकज पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक उद्योजक, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘अमृत’ प्रबोधिनीच्या या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावरील लघुउद्योजक, महिला बचत गट आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना त्यांच्या वस्तूंना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार असून ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहेत.

‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ हा उपक्रम स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण उद्योजकता, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version