२० जुलैपासून मुसळधार पावसाची हजेरी; सोयाबीन, कापूस व मका पिके पुन्हा तरारली
भवरखेडे | प्रतिनिधी (अजय बाविस्कर)
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात २० जुलैपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, काही दिवसांपासून पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्ण व कोरड्या वातावरणामुळे खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर होती. मात्र, दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
तालुक्यातील विविध भागांत सोमवारी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, सोयाबीन, कापूस, मका आदी खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पिके पुन्हा जोमाने वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे.
याशिवाय, या पावसामुळे विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याच्याही दृष्टीने हा पाऊस महत्त्वाचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसाच्या या दमदार कमबॅकमुळे धरणगाव तालुक्यातील बळीराजाने सुटकेचा श्वास सोडला असून, आगामी काळातही अशाच समाधानकारक पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
