Spread the love

कापूस व्यवस्थापन, नैसर्गिक शेती तंत्रज्ञान व शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन

शहादा | संजय मोहिते प्रतिनिधी

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौजे वैजाली येथे प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेती शाळेचा दुसरा वर्ग उत्साहात संपन्न झाला. या शेती शाळेत नैसर्गिक शेतीचा प्रसार, शाश्वत पीक उत्पादन आणि खर्चात बचत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी एस. बी. बागुल तसेच कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांनी मागील वर्गाचा आढावा घेत नैसर्गिक शेती शाळेची उद्दिष्टे आणि महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी एस. बी. बागुल यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना, उद्दिष्टे तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे यांनी कापूस पिकातील अंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच ‘दादा लाड तंत्रज्ञान’ अंतर्गत फांद्यांचे व फळधारणेचे वैज्ञानिक व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक उपायही सांगितले.

शेती शाळेनंतर प्रात्यक्षिक प्लॉटला प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची वाढ, व्यवस्थापन आणि तांत्रिक बाबींचे निरीक्षण करण्यात आले. शेतावरच मार्गदर्शन झाल्यामुळे कार्यक्रम अधिक उपयुक्त ठरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास अन्नदाता शेतकरी गटाचे सदस्य, ह.भ.प. भजनी मंडळाचे सदस्य तसेच गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी नैसर्गिक शेतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी योगेश मिस्त्री यांनी केले, तर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version