Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

आक्षेपार्ह व्हिडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी; भाजपे कार्यकर्ते सचिन काळभोर यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथितपणे जीवे मारण्याची धमकी देणारा आणि आक्षेपार्ह भाषा वापरणारा व्हिडिओ प्रसारित झाल्याचा दावा करत, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कथितपणे आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले असून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान हे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याने अशा स्वरूपाच्या कथित धमक्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात https://www.facebook.com/share/r/1DZsqBLoqc/ संबंधित व्हिडिओची सत्यता, तो प्रसारित करणाऱ्या व्यक्तीची ओळख, त्यामागील उद्देश आणि लागू असलेल्या कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सचिन काळभोर यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version