Spread the love

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: उद्घाटनापूर्वीच भारताचे पदक निश्चित; लव्हलीना बोरगोहेनची उपांत्य फेरीत धडक

७५ किलो गटात ‘बाय’ मिळाल्याने किमान कांस्य पदक पक्के; ३१ जुलैपासून सुवर्णपदकासाठी मोहिमेला सुरुवात

ग्लास्गो | प्रतिनिधी

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच भारताच्या खात्यात पहिले पदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॉक्सर लव्हलीना बोरगोहेन हिने ७५ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवत भारतासाठी किमान कांस्य पदक निश्चित केले आहे.

आसामच्या लव्हलीनाला पहिल्या फेरीत ‘बाय’ (Bye) मिळाल्याने ती थेट उपांत्य फेरीत पोहोचली. कॉमनवेल्थ गेम्सच्या मुक्केबाजी स्पर्धेच्या नियमानुसार उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक दिले जाते. त्यामुळे रिंगमध्ये उतरण्यापूर्वीच लव्हलीनाने भारतासाठी पहिले पदक निश्चित केले आहे.

लव्हलीना ३१ जुलैपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून, अंतिम फेरीत प्रवेशासाठी तिची लढत टी.के.बी.पी. ताफाकी हिच्याविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळाल्यास ती सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत खेळेल.

स्पर्धांच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच पदक निश्चित झाल्याने भारताच्या १२६ सदस्यीय पथकाचा आत्मविश्वास उंचावला आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळांची संख्या २० वरून १० वर आली असली तरी भारत अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. भारताचे लक्ष्य पदकतालिकेत अव्वल पाच देशांमध्ये स्थान कायम राखण्याचे आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version