‘शिबिरातून सर्वसामान्यांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ अंतर्गत धरणगावात भव्य समाधान शिबिर; २ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
जळगाव | प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ अंतर्गत धरणगाव येथे आयोजित भव्य समाधान शिबिरात दोन हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वरी सेवा आहे,” असे प्रतिपादन केले.
पालकमंत्री म्हणाले, शासनाची सेवा प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पोहोचली पाहिजे. नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच प्रशासनाच्या कार्याचे खरे यश असून, अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे शासन आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ होत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, विनय गोसावी, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि हजारो लाभार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन करत विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी पूर्ण करण्याचेही आवाहन केले. भविष्यातील चारा टंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांना चारा पिकांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
४,७५४ लाभांचे वितरण
महाशिबिरात महसूल, आरोग्य, पंचायत समिती, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, महावितरण, वन, सामाजिक वनीकरण, नोंदणी व मुद्रांक आदी विभागांच्या माध्यमातून ४,७५४ विविध लाभांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची गोल्डन कार्डे, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना, विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके व गणवेश, कृषी अवजारे, ट्रॅक्टर, बेबी केअर किट तसेच धरणगाव तालुक्यातील ५५ बचत गटांना ३.६७ कोटी रुपये आणि जळगाव तालुक्यातील ८६ बचत गटांना ५.५२ कोटी रुपयांचे बँक कर्ज व समुदाय गुंतवणूक निधीचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी अभियानाची माहिती दिली. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर आभार तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.
