Spread the love

उत्कर्ष मतिमंद संकुलात आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडी सोहळा उत्साहात

५ वी ते १० वीच्या विशेष विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विठ्ठल नामाच्या गजराने पिंप्राळा परिसर दुमदुमला

जळगाव (पिंप्राळा) | प्रतिनिधी

आषाढी एकादशीचे औचित्य साधून पिंप्राळा येथील उत्कर्ष मतिमंद संकुलात भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या नादात निघालेल्या दिंडीने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संकुलातील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विशेष विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होय. पारंपरिक नऊवारी साडी, धोतर, फेटे आणि कपाळावर बुक्का लावून विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या वेशात सजलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

हातात भगव्या पताका घेऊन विद्यार्थ्यांनी “ज्ञानबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषात दिंडी काढली. संकुलातून निघालेली दिंडी पिंप्राळा परिसरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि भक्तीभाव पाहून स्थानिक नागरिकांनी दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन संकुलाचे मुख्याध्यापक श्री. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची माहिती देत दिंडीचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले. विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, सहभाग आणि भक्तीभावामुळे हा दिंडी सोहळा संस्मरणीय ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version