Spread the love

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासन निकषांचे काटेकोर पालन, महिलांना ३३ टक्के आरक्षण; पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित नियुक्तीचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) नियुक्ती प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठित व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. शासन निर्णय दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ व ११ फेब्रुवारी २०२५ मधील सर्व निकषांचे काटेकोर पालन करून ही प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर यांच्यासह लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच तहसीलदार व अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

पालकमंत्री पाटील यांनी विशेष कार्यकारी अधिकारी हे शासन व नागरिकांमधील महत्त्वाचे दुवा असल्याचे सांगत प्रामाणिक, सेवाभावी, चारित्र्यसंपन्न व समाजाभिमुख व्यक्तींनाच संधी द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले.

नियुक्ती प्रक्रियेत महिलांसाठी किमान ३३ टक्के आरक्षण, लोकसंख्येनुसार निकष, उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदारांनी प्रस्तावांची सखोल छाननी करून पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नियुक्तीनंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना, अधिकार, कर्तव्ये, आचारसंहिता, आपत्ती व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि जनजागृती मोहिमांबाबत प्रशिक्षण देऊन ओळखपत्र व नियुक्ती प्रमाणपत्र तातडीने वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातील पात्र उमेदवारांचे प्रस्ताव दहा दिवसांच्या आत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. समित्यांमध्ये महिलांसह सर्व समाजघटकांचे संतुलित प्रतिनिधित्व राहील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. अपात्र किंवा वादग्रस्त व्यक्तींची शिफारस टाळून संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर, पारदर्शक आणि तक्रारविरहित पार पाडावी, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शासन निर्णयानुसार नियुक्ती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी नियुक्ती प्रक्रियेबाबत सविस्तर सादरीकरण केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version