स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंतांचा गौरव; परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाचा दिला संदेश
भुसावळ | प्रतिनिधी
नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे शाळेच्या माजी विद्यार्थिनी स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे (पूर्वाश्रमीच्या सुरेखा भंगाळे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. सन २०१२ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र आवटे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर नारखेडे (पुणे), शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने, सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. यावेळी सुधाकर नारखेडे यांनी गेल्या १४ वर्षांपासून विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यामागील प्रेरणा आणि स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम सुरू ठेवण्यामागील भावना व्यक्त केली.
यंदा प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. रोशनी विशाल परदेशी हिला १,५०१ रुपयांचा धनादेश, तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या आशिष विजय जाधव याला १,१०० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना सुधाकर नारखेडे यांना पत्नीच्या आठवणीने भावूक होऊन अश्रू अनावर झाले. त्यांच्या भावनिक मनोगताने उपस्थितांचे वातावरण भारावून गेले.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र आवटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत यशामागील मेहनत, सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. अपयशातून शिकून अधिक जोमाने पुढे जाण्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी शाळेच्या वतीने सुधाकर नारखेडे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले.
