NEET-TET पेपरफुटीच्या निषेधार्थ भुसावळात विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; ६ ते ७ हजार विद्यार्थी, पालक व विविध संघटनांचा सहभाग
संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी
देशातील NEET, TET आणि इतर स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी भुसावळ शहरात विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला.
रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी २ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात सुमारे ६ ते ७ हजार विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “पेपरफुटी बंद करा”, “शिक्षणमंत्री राजीनामा द्या” अशा घोषणांनी संपूर्ण शहर परिसर दणाणून गेला.
मोर्चानंतर विद्यार्थी प्रतिनिधी विवेक सपकाळे, फैजान शेख, अभय सोनवणे, प्रथम बोदडे, अश्विन नरवाडे, जबाद खान, अनिकेत सोनवणे, तय्यब शेख, सय्यद दानिश आणि हुसेन शहा यांनी भुसावळचे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात NEET पेपरफुटी प्रकरणाची तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशातील परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात हा लढा सुरूच राहील. सरकारने तातडीने ठोस निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांनी पुढे सांगितले की, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
