Spread the love

वरणगावात ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; पोलीस-एफडीएची संयुक्त कारवाई

राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा अडवून छापा; प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह एकाला ताब्यात

वरणगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला ₹५ लाख १७ हजार ८६८ किमतीचा गुटखा व पानमसाल्याचा साठा वरणगाव पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त केला. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची इनोव्हा (एमएच-२० बीडी-३०००) कारही जप्त करण्यात आली असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील कपीलवस्ती परिसरात करण्यात आली. संशयित वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा, केसरयुक्त विमल पानमसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

कारवाईदरम्यान विंग तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, करमचंद प्रीमियम पानमसाला, केसी-1000 यांसह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि इनोव्हा कार असा एकूण ₹५,१७,८६८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासासाठी प्रत्येक प्रकारातील नमुनेही घेण्यात आले आहेत.

या प्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version